Ad will apear here
Next
उभ्या भारता भूषण व्हावे मंदिर हे देखणे...
बालगंधर्व (नारायण श्रीपाद राजहंस)पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराचे सुवर्णमहोत्सवी वर्ष २६ जून रोजी सुरू झाले. त्या निमित्ताने विविध मान्यवरांनी आपल्या या रंगमंदिरासंदर्भातील उलगडलेल्या आठवणी ‘गंधर्वनगरीची पन्नाशी’ या लेखमालेतून ‘बाइट्स ऑफ इंडिया’ प्रसिद्ध करत आहे. त्यातीलच हा पुढचा लेख बालगंधर्वांच्या नातसून अनुराधा राजहंस यांचा...
.................
एखाद्या वास्तूचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होणे, ही बाब केवळ पुण्यातच घडू शकते. पुणे महानगरपालिकेने नटसम्राटांचे एवढे मोठे, सुंदर असे हे जे स्मारक तयार केले आहे, त्याबद्दल आम्ही राजहंस कुटुंबीय नेहमीच पालिकेचे ऋणी आहोत. अनेक कलाकारांनी बालगंधर्व रंगमंदिरात आपले आयुष्य घडवले आहे. या रंगमंदिराने त्यांच्या जीवनात कैक नवीन रंग भरले आहेत. रंगमंदिराच्या या व्यासपीठावर काम करणे म्हणजे खुद्द बालगंधर्वांचे आशीर्वाद मिळवण्यासारखेच आहे. खरे तर इतके मोठे स्मारक बांधून महानगरपालिकेने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली आहे. आता कलाकार आणि रसिक प्रेक्षक यांनी आपली जबाबदारी सांभाळली पाहिजे, ती म्हणजे रंगमंदिर व्यवस्थित ठेवण्याची. अर्थात पालिकेचीही जबाबदारी आहेच. परंतु आता ५० वर्षे झाली आहेत, तर कुठे तरी त्यात त्रुटी जाणवणारच. बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये रसिक अगदी खुर्च्यांवर उभे राहून नाचणे, अस्वच्छता पसरवणे, रंगमंदिरातील वस्तूंची मोडतोड करणे अशा गोष्टी करताना दिसतात. हे थांबले पाहिजे. जेवढी पालिकेची जबाबदारी आहे, तेवढीच रसिकांचीही आहे. 

ग. दि. माडगूळकर‘बालगंधर्व’ हे केवळ एखादे थिएटर नाही, किंवा एखाद्या देवाचे मंदिर नाही, ते एका नटसम्राटासाठी बांधलेले कलामंदिर आहे, जिथे कलेची पूजा केली जाते, जोपासना केली जाते. हे रंगमंदिर म्हणजे पुण्यभूमीचे एक भूषण आहे. विजयादशमीच्या दिवशी (सोमवारी) आठ ऑक्टोबर १९६२ रोजी खुद्द बालगंधर्वांच्या हस्ते रंगमंदिराचे भूमिपूजन करण्यात आले होते. या वेळी ग. दि. माडगूळकरांनी म्हटलं होतं...

विद्या, उद्यम, कला, संस्कृती येथे न काही उणे।
उभ्या भारता भूषण व्हावे, असे आमचे पुणे।।

यात ‘गदिमां’नी बालगंधर्व रंगमंदिराचाही उल्लेख केला होता. बालगंधर्वांची जन्मभूमी पुणेच आणि कर्मभूमीही. तेव्हा या नटसम्राटाचे एक भव्य स्मारक पुण्यात उभारावे अशी कल्पना त्या वेळी पुढे आली. विशेषतः पुणे महानगरपालिकेने यात पुढाकार घेतला. दरम्यान, त्या वेळचे महापौर शिवाजीराव ढेरे यांनी रंगमंदिर उभारण्याची घोषणा केली. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा या रंगमंदिराच्या उभारणीत सिंहाचा वाटा होता. त्या वेळी महाराष्ट्रातील ख्यातनाम चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांनी या रंगमंदिरात लावण्यासाठी गंधर्वांची दोन तैलचित्रे काढली. बालगंधर्वांच्या जन्मदिनी म्हणजेच २६ जून १९६८ रोजी या वास्तूचे उद्घाटन करण्याचे ठरले. दुर्दैवाने त्याआधीच बालगंधर्वांनी या जगाचा निरोप घेतला होता. 

पु. ल. देशपांडेआचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण ही दोन नावे प्रमुख उद्घाटक म्हणून निश्चित झाली. हा दिवस पुणे महापालिकेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असाच होता. खुद्द यशवंतराव चव्हाणांनी प्रवेशद्वारात श्रीफळ फोडून उद्घाटन केले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी ‘पुलं’ म्हणाले होते, 

“शरदाच्या चांदण्याचा सडा रंगमंचावर पडत होता, त्यावर स्वर्गीय पुष्पांची रंगावली रेखली जात होती. अमृतमय स्वरांचं सिंहासन इथं रंगमंचावर पडलं होतं; पण त्यावर विराजमान होणारा स्वरसम्राट मात्र दिसत नव्हता..”

ज्यांच्या प्रतिभेने, गाण्याने आणि अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला वेडे केले, अशा नटसम्राटाचे हे रंगमंदिर शहरातील एक उत्कृष्ट वास्तू ठरेल यात नवल ते काय. 

अनुराधा राजहंसनटसम्राटाच्या घरात स्थान मिळणे भाग्याचेच 

साधारणतः १९८०च्या दरम्यान माझे लग्न झाले आणि बालगंधर्वांची नातसून या नात्याने मी राजहंस घराण्यात आले. बालगंधर्व १९६७ साली गेले, त्यामुळे मला त्यांचा सहवास लाभला नाही. परंतु मूलतः मी एक कलाकार आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्यासारख्या व्यक्तीबद्दल मला प्रेम होतेच. तशी पूर्वी मी ‘पुरुषोत्तम’ला वगैरे कामं केलेली असल्याने नाटक या विषयाच्याही मी तशी जवळ होतेच; पण बालगंधर्व असताना पुण्यात नसल्यामुळे त्यांना भेटण्याचा कधी योग आला नाही. बालगंधर्वांसारख्या नटसम्राटाच्या घरात येण्याचे भाग्य मला लाभले. परंतु त्यांचा सहवास लाभला नाही ही एकच खंत. ही खंत भरून काढण्यासाठी मग मी आमच्याकडे बालगंधर्व यांच्या असलेल्या काही महत्त्वाच्या वस्तूंचा संग्रह केला. यात त्यांनी नाटकात वापरलेले शेले, त्यांचा ग्रामोफोन, इतर वस्तू संग्रहित आहेत. या वस्तूंचे प्रदर्शन आम्ही नियमितपणे भरवत असतो. या संग्रहांना खूप चांगला प्रतिसादही मिळतो.  

‘बालगंधर्व संगीत रसिक मंडळ’ या नावाचा एक ग्रुप आम्ही सध्या चालवत आहोत. या ग्रुपची मी उपाध्यक्षा आहे. या मंडळाच्या निमित्ताने गंधर्वांची सगळी संगीत नाटके आम्ही केली आहेत. आता कान्होपात्रा या नाटकाचे प्रयोग सुरू आहेत. बालगंधर्व यांच्यावर मी भरपूर लिखाणही केले आहे. अगदी मनातून आणि बालगंधर्वांच्या आठवणीप्रीत्यर्थ काही सांगायचे झाले तर मी एकच म्हणेन, ‘गंधर्वांच्या गळ्यातील स्वरदेवता अगदी एका क्षणासाठी जरी आमच्या गळ्यात प्रकट झाली, तरी गंधर्वांनाच जोहार नाना असे आम्ही म्हणू...’ सरतेशेवटी या पुण्यनगरीतील रसिक प्रेक्षकांना एकाच विनंती असेल, की 

नगर जनांनी आता इजसी, जपणे सांभाळणे.
उभ्या भारता भूषण व्हावे, मंदिर हे देखणे..

- अनुराधा राजहंस 
(लेखिका बालगंधर्व यांच्या नातसून, तसेच रंगकर्मी आहेत)   

(शब्दांकन : मानसी मगरे)
...................
(पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराचं सुवर्णमहोत्सवी वर्ष २६ जून २०१७ रोजी सुरू झालं. त्या निमित्तानं, या रंगमंदिराशी निगडित असलेल्या अनेक मान्यवरांच्या आठवणींचा खजिना ‘गंधर्वनगरीची पन्नाशी’ या विशेष लेखमालेद्वारे ‘बाइट्स ऑफ इंडिया’ उलगडत आहे. या लेखमालेतले सगळे लेख एकत्रितरीत्या या लिंकवर उपलब्ध असतील.)

बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZMEBE
 या सुवर्ण महोत्सव वी वर्षात बाल गंधर्व रंग मंदिराचा भरपूर विकास घडावा
Similar Posts
कशासाठी? पोटासाठी... खंडाळ्याच्या घाटासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत पु. ल. देशपांडे यांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग होता. २६ जून १९६८ रोजी या रंगमंदिराचं उद्घाटन झालं. यंदा हे रंगमंदिर सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. उद्घाटनावेळी पुणे महापालिकेनं ‘नमन नटवरा’ ही स्मरणिका प्रकाशित केली होती. त्या स्मरणिकेत ‘पुलं’नी आपल्या जादुई लेखणीनं
‘मर्मबंधातली ठेव’ पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर पहिले दोन-तीन दिवस नाट्यमहोत्सव झाला होता. ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. भालबा केळकर यांचे ‘तू वेडा कुंभार’ हे नाटक त्यात सादर झाले होते. आताचे ज्येष्ठ नाटककार आणि अभिनेते सतीश आळेकर यांनी त्या नाटकात काम केले होते. अशा रीतीने उद्घाटन सोहळ्याशी थेट जोडले
‘तो काळच मंतरलेला होता...!’ मराठी चित्र-नाट्य सृष्टीतले बुजुर्ग कलाकार आणि ‘जागर’सारख्या संस्थेशी प्रारंभापासून निगडित असलेले आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणजे माधव वझे. बालगंधर्व रंगमंदिरसारख्या देखण्या वास्तूच्या उभारणीसाठी जी समिती काम करत होती, त्या समितीत पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य वझे यांना लाभले आहे. त्यांच्याकडे
‘तीन दशकांचं, दृढ होत जाणारं नातं’ ‘गंधर्व’ला नाटक करणं हे जणू एक स्टेटस सिम्बॉल असल्यासारखं असायचं!....’ ही भावना आहे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची. ‘बालगंधर्व’च्या सुवर्णमहोत्सवाच्या औचित्यानं त्यांची भेट घेतली असता, त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला, या नाट्यगृहाची वैशिष्ट्यंही सांगितली आणि तीन दशकांहून अधिक काळ या नाट्यगृहाशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language